
पालिका शाळांतील शौचालयांचे नुतनीकरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : अस्वच्छता, दुर्गंधी... सॅनेटरी नॅपकीन टाकण्याची सुविधा नाही, हात स्वच्छ करण्यासाठी साबणही नाही. ठाणे महापालिका शाळांमधील बहुतेक सर्वच शौचालयांची ही अवस्था आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी मधल्या सुट्टीत शौचालयांचा वापर करण्याचे टाळतात. परिणामी, त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत, स्वच्छ शौचालय मिळावे यासाठी लवकरच पालिकेच्या सर्वच शाळांच्या शौचालयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शाळांचाही दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
ठाणे शहराचे सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून रुपडे पालटताना अद्ययावत, स्वच्छ शौचालय देण्याची मोहीम ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हाती घेतली आहे. त्यासाठी शहरातील सर्वच ९०० शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी ८० ते ९० टक्के शौचालयांची अवस्था खूपच बिकट असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये पालिका मुख्यालयापासून ते शाळा आणि सार्वजनिक शौचालयांचाही समावेश आहे. शौचालयांची ही दुरवस्था दूर करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी शौचालय नूतनीकरणाची मोहीम आयुक्तांनी मुख्यालयापासूनच सुरू केली आहे. त्याअंतर्गत तळमजल्यावरील शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, आता सर्व चारही मजल्यावरील शौचालये स्वच्छ व दुर्गंधीमुक्त ठेवण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पालिकेच्या सर्व इमारतींमध्येही हीच मोहीम राबवण्यात येणार आहे. याला पालिका शाळाही अपवाद नसणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या शहरासह कळवा, मुंब्रा, दिव्यात सुमारे १२४ शाळा असून येथे आर्थिक दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पालिका शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये इमारत पुर्नबांधणीपासून ते डिजिटल वर्गापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. पण दर्जा सुधारत असताना या शाळांमधील शौचालयांकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नव्हते. यामध्ये सर्वाधिक कुचंबणा विद्यार्थिनींची होत आहे. कुठे पाणी नाही, तर कुठे साबण नाही. स्वच्छतेची बोंब, सॅनेटरी नॅपकीन विल्हेवाटची सोयही नाही. अनेकवेळा त्यामुळे युरीन इन्फेक्शनलाही सामोरे जावे लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वच पालिका शाळांच्या शौचालयांचे नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिक्षक, कर्मचारी वर्गालाही दिलासा
शौचालयाच्या दुरवस्थेची समस्या केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्गालाही भेडसावत आहे. त्यामुळे शाळांच्या शौचालयांचे नूतनीकरण झाल्यास शिक्षकांनाही दिलासा मिळणार आहे.
स्वच्छतेवर भर
केवळ शौचालयांचे नूतनीकरण करून काहीच होणार नाही. ते स्वच्छ आणि निर्जंतुक राहतील याची काळजी घेणेही गरजेचे आहे. म्हणून शौचालय स्वच्छतेसाठी अद्ययावत मशिन्सचाही वापर करण्याचा विचार सुरू असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.