
उष्णतेमुळे माठ विक्रीत तेजी
नवीन पनवेल, ता. २० (वार्ताहर)ः वातावरणातील बदलांमुळे उष्णतेची लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत थंड पाणी पिण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा स्थितीत अनेकांना फ्रिज घेणे शक्य नसल्याने उन्हाळ्यात मातीच्या माठाला मागणी असते. त्यामुळे पनवेल शहर, तसेच वसाहतींमधून मातीच्या माठांची विक्री सुरू झाली आहे.
दर वर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणारा माठ यंदा बाजारात लवकर दाखल झाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. अशातच थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रिज घेणे सगळ्यांनाच परवडत नसल्याने मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. पनवेलसह परिसरामध्ये सध्या माठ विक्रीची दुकाने थाटण्यात आली असून बदलत्या काळानुसार पारंपरिक माठांबरोबर आता रंगीबेरंगी माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
--------------------------------
किमती अजूनही स्थिर
मातीच्या माठात आरोग्याच्या दृष्टीने अनेक गुणधर्म असतात. तसेच माठातील पाणी थंड होण्यासाठी विजेचीही गरज नसते. यामुळे नैसर्गिकरित्या माठातील पाणी थंड होत असते, पण माठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. तरीही माठाच्या किमती स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.