
साने येथे भव्य नृत्य स्पर्धा
वासिंद, ता. २० (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासिंद जवळच्या साने गावात शिवतेज प्रतिष्ठानतर्फे भव्य नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पारंपरिक वेशभूषेत, मावळ्यांसमवेत ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या नृत्य स्पर्धेत गावातील व परिसरातील शिवप्रेमी कलाकारांनी विविध प्रकारची ३६ वैयक्तिक नृत्य, सामुहिक नृत्य, नृत्य नाटिका सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. समुह नृत्यात ग्राउंड झीरो पडघा गटने प्रथम; तर अस्मिता जाधव व कार्तिकी भेरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत रोहित पाटील प्रथम, काजल कदम द्वितीय, वैष्णवी पाटील व रोहित पाटील यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. शिवतेज ग्रुपच्या कलावंतांनी सादर केलेल्या तानाजीची मोहीम या नाटिकेला विशेष पारितोषिक देण्यात आले.