रस्ता ठेकेदार काळ्या यादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता ठेकेदार काळ्या यादीत
रस्ता ठेकेदार काळ्या यादीत

रस्ता ठेकेदार काळ्या यादीत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांना पहिला दणका पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे. कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरुस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याने कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. या काळात त्यांना ठाणे महापालिकेच्या इतर कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचबरोबर, या कामाची पर्यवेक्षणीय जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे अष्टविनायक चौक येथे गेले काही महिने रस्त्याचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांचे या कामाकडे बारीक लक्ष होते. रस्त्याचे काम कमी दर्जाचे होत असल्याचे तेथील एका नागरिकाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले. काम खराब होत असल्याची त्या नागरिकाने तक्रार केल्यानंतर संबंधित कामाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला आयुक्तांनी पाहणी करण्यास सांगितले. त्यावर, कंत्राटदाराने न सांगताच हे काम केले आहे. शिवाय त्याची आता दुरुस्तीही केली आहे, असा अहवाल सादर केला.

तक्रारदाराने मात्र त्याचा पाठपुरावा कायम ठेवला. कामाच्या दर्जाबाबत त्याचे म्हणणे कायम राहिल्याने, आयुक्त अभिजीत बांगर यांनी अष्टविनायक चौक येथील रस्त्याच्या कामाला अचानक भेट दिली. या भेटीत, रस्त्याचे काम योग्य दर्जाचे नसल्याचे त्यांच्याही निर्दशनास आले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. कामाच्या दर्जाबद्दल त्यांना वाटणारी चिंता त्यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली. अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांनी त्यात लक्ष न घातल्याची खंतही व्यक्त केली.

------------------------------
कारणे दाखवा नोटीस
रस्त्याचे काम मास्टिक प्रकारचे असून या कामात डांबराचे तापमान योग्य न राखल्यास रस्त्याचा पृष्ठभाग लवकर उखडतो. परंतु, तांत्रिकदृष्ट्या योग्य काम झाल्यास किमान दहा वर्षे हा रस्ता खड्डेमुक्त राहू शकेल, अशी खात्री दिली जाते. अष्टविनायक चौकातील मूळ रस्ता खराब झालाच, शिवाय त्याची दुरुस्तीही नीट झाली नाही. याची दखल घेत, त्या कंत्राटदाराला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले. कंत्राटदाराने असमाधानकारक खुलासा केला. त्यामुळे त्याला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस बजावण्यात आली. तर संबंधित कामाच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
-----------------------------
कंत्राटदाराने केली चूक मान्य
नोटीशीच्या उत्तरात त्याने मूळ काम आणि त्याची दुरुस्ती खराब असल्याचे मान्य केले. त्यामुळे, एकंदर हे काम करताना कंत्राटदाराचा हेतू प्रामाणिक नसल्याच्या निष्कर्षाप्रत महापालिका प्रशासन आले. नागरिकांनी तक्रार केली नसती तर रस्त्याची दुरुस्तीही झाली नसती. या पार्श्वभूमीवर, कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणे, तसेच, ठाणे महापालिकेच्या इतर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून प्रतिबंध घालण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.