
कोकण आयुक्तांकडे बिंदुनामावलीचा प्रस्ताव
विरार, ता. २० (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. सरळ सेवेतून कर्मचारी पद भरती प्रक्रियेसाठी मागील महिन्यात हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. यामध्ये पालिकेच्या आस्थापना विभागातर्फे बिंदुनामावली तपासण्याचे काम करण्यात येत होते. हे काम पूर्ण झाल्यावर आता प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. यावर कोकण आयुक्त कधी निर्णय घेतात, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच पदभरतीची संख्या समोर येणार आहे.
महापालिकेत सध्या मोठ्या प्रमाणात तत्कालीन नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमधील कर्मचारी काम करत आहेत. त्याचप्रमाणे अनेक कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांवरच महापालिकेची मोठी भिस्त आहे. मात्र अनेक कर्मचारी हे अकुशल आणि कमी शैक्षणिक अर्हता असलेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामामध्ये दिरंगाई आणि योग्य पद्धतीने काम न करणे अशा घटना घडताच असतात. त्यामुळे महापालिकेचा कारभार हा ठेक्याच्या कर्मचाऱ्यांवर न ठेवता कायम कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी वसईतील नागरिक मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र आता शासनाने सरळ सेवेतून पदभरतीच मार्ग मोकळा केल्याने पालिकेला आता कायम कर्मचारी मिळणार आहेत.
बिंदुनामावली तपासणी केल्यानंतर कर्मचारी पद भरती प्रक्रियेसाठीचा प्रस्ताव सध्या कोकण आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. यामध्ये मुख्यतः वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या पदासाठी भरती असणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका