
गुटखा तस्करीत तरुणाला अटक
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : नेरूळ पोलिसांनी ३० हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी जुबेर बुनियादअली खान (२४) याला अटक केली असून स्कुटीदेखील जप्त केली आहे.
शिरवणे सेक्टर - १ भागात एक व्यक्ती स्कुटीवरून गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढगे यांनी पथकासह गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री शिरवणे सेक्टर-१ भागात सापळा लावला होता. यावेळी पावणेएकच्या सुमारास शिरवणे येथील फोक्सवॅगन शोरुमच्या समोरील जुईनगर रेल्वे स्टेशनकेड जाणाऱ्या रस्त्यावर जुबेर खान हा स्कुटीवरून आला. या वेळी पोलिसांनी त्याची तपासणी केली असता एका गोणीमध्ये साधारण ३० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी जुबेर खानला अटक केली आहे. तसेच त्याची स्कुटीदेखील जप्त केली आहे.