
सकल मातंग समाजाचा आज आझाद मैदानात मोर्चा
मुंबादेवी, ता. २१ (बातमीदार) ः सकल मातंग समाजाच्या वतीने विविध संघटना एकत्र येऊन बुधवारी (ता. २२) आझाद मैदान येथे महामोर्चा काढीत धडक देणार असल्याची माहिती ॲड. राम चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांच्यासोबत अशोक ससाने, शंकर कांबळे, अशोकराव आल्हाट उपस्थित होते.
चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गात ५९ जाती असून या प्रवर्गासाठी असलेल्या नोकरी व शिक्षणाचा आरक्षणाचा लाभ निवडक एक दोन जातींनाच मिळत आहे. संविधान अनुच्छेदाप्रमाणे राज्य शासनाने आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवून एक प्रकारे संविधानाचा अपमान केला असल्याचा त्यांनी आरोप केला. नोकरी, शिक्षण यामध्ये १३ टक्के आरक्षण हे अ, ब, क, ड असे वर्गीकरण केल्यानंतरच प्राप्त होईल. मातंग समाज हा विविध लाभांपासून वंचित राहिलेला आहे. आमच्या हक्काच्या प्राप्तीसाठी आम्ही महाआंदोलन करणार आहोत, असे ॲड. राम चव्हाण यांनी म्हटले.
आर्टी स्थापनेची मागणी
अनुसूचित जातीच्या आरक्षण गटामध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण करणे गरजेचे आहे. बार्टीच्या धर्तीवर आर्टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापना व्हावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील मातंग समाज आझाद मैदानात धरणे आंदोलन करील, असे अशोक आल्हाट यांनी सांगितले.