
ठाणे ते कल्याणदरम्यान शटल सुरू करा
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : लोकलने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या पाहता ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकामध्ये सकाळच्या सत्रात प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. ही गर्दी कमी करण्यासाठी कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू करण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाणे रेल्वे स्थानक प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण आणि ठाणे रेल्वे स्थानकामधील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या धर्तीवर कळवा यार्ड परिसरात नव्याने रेल्वे स्थानक उभारून तेथून लोकल सोडाव्यात, अंधेरीच्या धर्तीवर ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करावा, सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या काळात ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानक दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन खुली राहते. यामुळे या कालावधीत कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानक दरम्यान शटल सेवा सुरू करा आदी मागण्या रेल्वे संघटनेने केल्या असून रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.