विकासकामांमध्ये राजकीय पुढाऱ्यांकडून वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामांमध्ये राजकीय पुढाऱ्यांकडून वसुली
विकासकामांमध्ये राजकीय पुढाऱ्यांकडून वसुली

विकासकामांमध्ये राजकीय पुढाऱ्यांकडून वसुली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : महापालिकेमार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामे, प्रकल्प आणि पुनर्विकासांच्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून राजकीय पुढाऱ्यांमार्फत बेसुमार पद्धतीने पैशांची वसूली सुरू असल्याचा धक्कादायक आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. विशेष म्हणजे वाशी, सानपाडा येथे सुरू असलेल्या विकास कामांमध्ये आणि कोपरखैरणे येथील सोसायटीच्या पुनर्विकासामध्ये मलिदा लाटण्यासाठी आपल्या नावाचा वापर केल्याचे म्हात्रे यांनी उघड केले. यापुढे हा प्रकार न थांबवल्यास पत्रकार परिषद घेऊन नावे जाहीर करेन, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला.
नवी मुंबईत सध्या महापालिकेतर्फे रस्त्यालगत गटारे, पदपथ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. वाशीमध्ये सायकल ट्रॅक तयार केला जात आहे. तसेच या विभागात महापालिकेतर्फे वाणिज्य संकुल आणि इतर कोट्यावधी रुपये खर्च करून प्रकल्प राबवले जात आहेत. सानपाडा येथे पदपथासह उद्याने आणि वाहतूक बेटे सुशोभीकरणाच्या कामांनी वेग घेतला आहे. ही कामे करत असणाऱ्या कंत्राटदारांकडून मंदा म्हात्रे यांच्या नावाचा वापर करून थेट पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी म्हात्रे यांच्याकडे आल्या आहेत. तसेच कोपरखैरणे येथे तर एका सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामात म्हात्रे यांच्या नावाने कंत्राटे आणि कमिशन मागण्यापर्यंत काही राजकीय नेत्यांची मजल गेली आहे. म्हात्रे यांना याबाबत एका त्रयस्थ व्यक्तीने माहिती दिल्यानंतर त्यांनी खरे-खोटे सुनावले. वाशीमध्ये अशा प्रकारे म्हात्रे यांच्या नावाने काही राजकीय नेते कंत्राटदारांकडून पैसे मागत असल्याची तक्रार काही कंत्राटदारांनी म्हात्रे यांच्याकडे केली आहे. म्हात्रे यांनी अशा लोकांची माहिती गोळा केली असून आगामी अधिवेशनात तक्रार करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
----------------------------------
महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांकडून काही राजकीय मंडळी पैसे उकळत असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. माझ्या नावाने हे धंदे सुरू आहेत. अशा लोकांनी लवकरच हे गैरकृत्य थांबवले नाही, तर आगामी अधिवेशनात त्यांच्याविरोधात नावाने तक्रार करेन.
- मंदा म्हात्रे, बेलापूर आमदार भाजप