
उरणमध्ये महाआरोग्य शिबिर
उरण (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (ता. २५) चिर्ले शाळेत सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत शिवसेनेचे उरण शहर वैद्यकीय कक्षप्रमुख चैतन्य पाटील यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, मोफत औषधे, ईसीजी, विविध आजार, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, मूळव्याध, हर्निया अशा विविध आजारांच्या तपासण्याचा समावेश आहे. मुंबई व नवी मुंबई परिसरातील अपोलो रुग्णालय, मेडिकोवर, फिनिक्स, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सुश्रूषा हॉस्पिटल आदी रुग्णालयांचा शिबिरात समावेश आहे. शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अनेक मंत्री व इतर प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरण शहर कक्ष प्रमुख चैतन्य पाटील यांनी केले आहे.