
पोलिस भरतीची शारिरिक चाचणी पूर्ण
भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी सुरू असलेल्या चालक व शिपाई या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेतील शारिरिक चाचणीची फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीत एकूण ४९ हजार ४७९ उमेदवार सहभागी झाले होते. त्यातील १३ हजार ५२३ उमेदवार शारिरिक चाचणीत अपात्र ठरले आहेत.
भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर २ जानेवारीपासून शारिरिक चाचणीला सुरुवात झाली होती. सुरुवातीला पुरुष उमेदवारांची व नंतर महिला उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. पोलिस शिपाई व चालक या पदांच्या एकूण ९९६ पदांसाठी ७१ हजार ९५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र ४९ हजार ४७९ उमेदवारच शारिरिक चाचणीला उपस्थित राहिले. या उमेदवारांची शारिरिक चाचणीसह धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी देखील घेण्यात आली त्यात ३५ हजार ९५६ उमेदवार पात्र ठरले तर १३ हजार ५२३ उमेदवार अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढच्या फेरीत लेखी परिक्षा घेतली जाणार आहे.
शारिरिक चाचणीची प्रक्रिया त्यंत पारदर्शक व्हावी यासाठी ही प्रक्रिया पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पार पडली. प्रत्येक उमेदवाराला संगणकीय चीप देण्यात आली होती. त्यामुळे शारिरिक चाचणी दरम्यानची सर्व माहिती आपोआपच संगणकावर नोंदवली जात होती. त्याच प्रमाणे सर्व प्रक्रियेवर सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही करडी नजर ठेवण्यात आली होती.