कळंबोली, तळोज्यातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोली, तळोज्यातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी
कळंबोली, तळोज्यातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी

कळंबोली, तळोज्यातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी

sakal_logo
By

खारघर, ता. २१ (बातमीदार) : सिडकोच्या तळोजा येथील गृहसंकुलातील केदार सोसायटीमधील एका घराला लागलेल्या आगीमुळे सिडकोच्या गृहसंकुलातील अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास आले होते. या समस्येकडे रविवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या ‘तळोज्याच्या अग्निसुरक्षेला धोका’ या मथळ्यातून ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत सिडकोच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी कळंबोली आणि तळोजामधील गृहसंकुलातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी केली आहे.
तळोजा फेज दोन सेक्टर २१ मधील केदार गृहसंकुलात शनिवारी रात्री आठच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्याला आग लागली होती. या वेळी भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या अजय बिलोड यांच्या घराचे लागलेल्या मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या वेळी स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न केले. मात्र, या आपत्कालिन परिस्थितीत सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळंबोली येथील अग्निशमन केंद्राला पाहणी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कळंबोली येथील सिडकोच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सेक्टर १५, कळंबोली सिडकोच्या ९७२ घरे असलेल्या गृहसंकुलात अग्निशमन यंत्रणेची पाहणी केली आहे; तर सोमवारी आणि मंगळवार तळोजा सेक्टर २१, २२, २७ असलेल्या इमारतींमधील अग्निशमन यंत्रणांची पाहणी करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळंबोली येथील संकुलातील अग्निशमन यंत्रणा कार्यरत असल्याचे; तर तळोजा येथील गृहसंकुलात अग्निशमन यंत्रणेत काही ठिकाणी बिघाड; तर काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याचे दिसून आले आहे.
-----------------------------
सुरक्षारक्षकांना गुरुवारी प्रशिक्षण
सिडकोच्या गृहसंकुलात अचानक आगीची घटना घडल्यास सोसायटीत असलेली अग्निशमन यंत्रणा कशा प्रकारे कार्यान्वित करावी, याविषयी प्रत्येक सोसायटीमधील दहा ते पंधरा रहिवासी तसेच सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना गुरुवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ः------------------------------------
सिडकोच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलात सोमवारी पाहणी केली आहे. सद्यस्थितीत संकुलातील सर्व अग्निशमन यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले.
- प्रमोद डांगे, अभियंता, शिर्के कंपनी