
५० ते ६० जणांची फसवणूक
मर्चंट नेव्हीच्या नोकरीच्या बहाण्याने
५० ते ६० जणांची फसवणूक
आरोपीस उत्तर प्रदेशातून अटक
मुंबई, ता. २१ : मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने देशभरातील ५० ते ६० नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. शुभम गुप्ता असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशातील कानपूरमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावल्याचे सांगण्यात आले.
शुभमने सोशल मीडियावर व्ही. आर. मरीन नावाने बनावट खाते तयार केले होते. त्यावर मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. अनेकांनी तिथे नोकरीसाठी अर्ज केला होता. प्रोसेसिंग फी म्हणून पैसेही जमा केले होते. जवळपास ५० ते ६० बेरोजगार तरुणांकडून पैसे घेण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकालाही नोकरी देण्यात आली नाही. शुभमने नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. फसवणूक झालेल्या व्यक्तींनी मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०२२ मध्ये तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान संबंधित जाहिरात उत्तर प्रदेशातून देण्यात आल्याचे उघड झाले. उमेदवाराकडून घेण्यात आलेले पैसेही तेथील विविध बँकांच्या एटीएममधून काढण्यात आले होते. आरोपीने सोशल मीडियावर केलेल्या खात्याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये त्याचा शोध लागला. त्वरित पोलिसांनी कार्यवाही करत त्याला ताब्यात घेतले.