
निवारागृह बनले आकर्षक शाळा
अंबरनाथ, ता. २२ (बातमीदार) : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांना आकर्षक रंग देऊन त्यांचा कायापालट करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प तितीक्षा फाऊंडेशनने केला आहे. उल्हासनगर येथील खुल्या निवारागृहाचे आकर्षक शाळेत रूपांतर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
तितीक्षा फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि भाजयुमो प्रदेश विद्यार्थी विभागाच्या सहसंयोजिका पायल कबरे यांनी याआधी अंबरनाथ तालुक्यातील गोरपे येथील जिल्हा परिषदेची तसेच बोहोंनोली येथील शाळेला आकर्षक रंगरंगोटी करून शाळांचे रूप बदलले होते. त्याच धर्तीवर उल्हासनगरच्या श्रमिक महिला मंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या निवारागृहातील शाळेच्या वर्गांना फाऊंडेशनच्या माध्यमातून रंगरगोटी करून आकर्षक शाळेमध्ये रूपांतर केले.
उल्हासनगरमधील शाळेचे उद्घाटन माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उल्हासनगर जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, लाल पंजाबी, राजेश वानखेडे, चार्ली पारवानी, अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे, भाजपचे पदाधिकारी भरत फुलोरे, सुजाता भोईर, रोहिणी भोईर, लता पगारे, सुनंदा अमोदकर, पराग वेलणकर आदी उपस्थित होते. या वेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. तितीक्षा फाऊंडेशनने गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे माजी मंत्री पाटील यांनी कौतुक करून फाऊंडेशनला आवश्यक ते सहकार्य करू, असे सांगितले. त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या उपक्रमाला सहकार्य करण्याची ग्वाही भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली.
--------------------------
शाळेबद्दल रुची वाढण्यासाठी प्रयत्न
आदिवासी आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या नागरिकांच्या मुलांसाठी शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. अशा शाळांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने फाऊंडेशनच्या माध्यमातून शाळांचा कायापालट करण्यात येत आहे. शाळांच्य भिंतींवर मुलांना आवडणाऱ्या प्राण्यांची चित्रे, अभ्यासक्रमातील गंमतीजमती, खेळ, कार्टुन आदींचे रेखाटन करण्यात आले आहे. शिवाय शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे, भविष्यात अशा शाळांत वाचनालय सुरू करण्यात येणार असल्याचा मनोदय पायल कबरे यांनी व्यक्त केला.