
अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती ठाणेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. सीना नदीकाठी वसलेल्या या गावात धनगर समाजाचे दैवतांचा जन्म झाल्याने ती भूमी पवित्र झाली आहे. त्यामुळे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथून अहिल्यानगर नामांतरासाठी रथयात्रा काढण्यात आली होती. संपूर्ण नगर जिल्ह्यातील गावात फिरून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या रथयात्रेची सांगता नुकतीच झाली आहे. धनगर समाजाने केलेल्या या मागणीला महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती ठाणे यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना ठाणे येथील पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. ज्याप्रमाणे उस्मानाबादचे धाराशीव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले, त्याच धर्तीवर अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करावे, अशी समस्त धनगर समाजाची भावना आहे. त्यांच्या भावनाचा आदर करून नामांतर करावे, अशी भावना या वेळी ज्ञानेश्वर परदेशी यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर व्यक्त केली.