स्थानकालगत ‘शेअर’बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानकालगत ‘शेअर’बंदी
स्थानकालगत ‘शेअर’बंदी

स्थानकालगत ‘शेअर’बंदी

sakal_logo
By

ठाणे, ता. २२ (वार्ताहर) : कापूरबावडी... माजिवाडा...घोडबंदर... कोलशेत... एक सीट एक सीट... अशी होणारी ओरड आणि हॉर्नचा कर्णकर्कश्य आवाज... ठाणे स्थानकाबाहेर बेशिस्त रिक्षाचालकांमुळे होणारा हा त्रास आता गायब झाला आहे. ठाणे पालिका आयुक्तांच्या सूचनेनंतर वाहतूक पोलिसांनी रिक्षांना शिस्त लावण्यासाठी स्थानक परिसराच्या ५० मीटर परिघात शेअर रिक्षांना ‘नो एण्ट्री’ दिली आहे. केवळ मीटर रिक्षांना स्टँडमधून भाडे आकारण्यास मुभा देत शेअर रिक्षांना निर्धारित थांब्‍यावरूनच प्रवासी घेण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात रिक्षांची गर्दी आणि दादागिरी कमी झाली असून प्रवाशांनीही मोकळा श्वास घेतला आहे.

ठाणे शहराचा कायापालट करत असताना स्थानक परिसरही ‘सुटसुटीत’ करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करत स्थानक परिसर मोकळा केला. पण रिक्षाचालकांची दादागिरी कायम होती. अधिकृत स्टँडला रिक्षा न लावता फलाटला लागूनच चालक रिक्षा उभ्या करून प्रवाशांना त्रास देत असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात तक्रारीही वाढल्या होत्या. ‘सकाळ’नेही याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करून शेअर रिक्षा वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत होते. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आणि गर्दीचा आढावा नुकताच पालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे वाहतूक शाखा उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी घेतला होता. दरम्यान, सोमवारी वाहतूक पोलिसांनी अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या शेअर रिक्षांना रांगेत उभे राहण्याची शिस्त शिकवली. उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचे संकेतही दिले. यासाठी परिसरातील सीसीटीव्हीच्या संख्येत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तरीही लूट सुरूच...
ठाणे स्टेशन परिसरात लागलेल्या रिक्षांच्या रांगांमध्ये महिला रिक्षाचालकांचाही समावेश आहे. दरम्यान कळवा, घोडबंदर रोड, किसननगर, भिवंडी सारख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी शेअर रिक्षा आहेत. मात्र या शेअर रिक्षा रांग न लावता, स्टेशन परिसरात, सॅटिसखाली, अलोक हॉटेल येथे रस्त्यावर उभ्या करून भाडे घेतात. त्यामुळे रस्त्यावरून चालणारे पादचारी आणि रिक्षांना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मात्र, आता ५० मीटरच्या परिघात शेअर रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नोकरदार ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण असे असले तरी काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरूच असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्यांना शेअर रिक्षासंदर्भात माहिती नसते अशा प्रवाशांना हेरून काही रिक्षाचालक मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
------------------------------------------
रोष वाढला
बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्‍त लागावी यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये सध्या रोष वाढला आहे. पण हा रागही कालांतरणाने कमी होऊन वाहतूक शिस्त लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, स्टेशन परिसरात सीसीटीव्ही वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------------------------------------
ऑनलाईन कारवाईचे संकेत
शेअर रिक्षाचालकांना कुठेही उभे राहून भाडे घेण्याची सवलत आणि सुरू असलेली परंपरा ही संपुष्टात आणण्यात आलेली आहे. आता शेअर रिक्षाचालकांनाही रांगेत उभे राहून भाडे घ्यावे लागणार आहे. या शिस्तीचा भंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्‍या माध्‍यमातून ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
------------------------------------------
ठाणे स्टेशन परिसरात रांगेतील रिक्षांव्यतिरिक्त कळवा, दिघा, घोडबंदर रोड, किसान नगर अशा लांब पल्ल्याच्या प्रवाशांना शेअर रिक्षा प्रवासी भाडे परवडते. दरम्यान शेअर रिक्षा या कुठेही उभ्या करून भाडे घेत असल्याने वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी शेअर रिक्षानाही स्टेशन परिसरात रांगेत उभे केले आहे. तशी ही कार्यपद्धती योग्य आहे. यामुळे प्रवाशांनाही स्टेशनमधूनच शेअर रिक्षा मिळतील आणि रिक्षा चालकांना शिस्त लागेल.
-ऋषी पाटील (प्रभारी अध्यक्ष-विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी चालक संघटना)