
विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
भांडुप, ता. २२ (बातमीदार) ः संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनांमार्फत कांजूरमार्ग येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्य पातळीवरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचाही आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षांत मानधनामध्ये वाढ केलेली नाही; ती करण्यात यावी, पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली अंगणवाड्या बंद करण्याचा शासनाचा विचार मागे घ्यायला लावणे, पोषण ट्रॅकर अॅप मराठीत देणे, मदतनीस, सेविका व मुख्य सेविकांच्या रिक्त जागा भरणे, पदोन्नतीला प्राधान्य देणे, दिवाळीला तुटपुंजी भाऊबीज न देता एका महिन्याच्या मानधनाइतका बोनस देण्यात यावा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी अनेक वेळा आंदोलने केली; मात्र सरकारने महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर परिसरातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस जमल्याचे पाहायला मिळाले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका या शासकीय सेवेपासून वंचित आहेत. शासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली, तरीही शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत.
- स्नेहा सावंत, अंगणवाडी सेविका