उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत अनवाणी राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत अनवाणी राहणार
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत अनवाणी राहणार

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत अनवाणी राहणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : आपल्या पक्षाचे प्रमुख अडचणीत असल्याचे पाहात कल्याणमधील शिवसैनिक आशा रसाळ यांनी देवीच्या चरणी अनोखी प्रार्थना केली आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ रसाळ यांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा मातेसमोर घेतली आहे. ठाकरे यांच्यावरील कार्यकर्त्यांची ही निष्ठा आणि त्यांच्यासाठी केली जाणारी प्रार्थना पाहून शिवसैनिकांची मने हेलावली आहेत.

शिवसेना ठाकरे व शिंदे गटात दुभागली गेली तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रति निष्ठा व्यक्त करत ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाकडून कडाडून विरोध होत असला, तरी कार्यकर्ते त्यांना खंबीरपणे तोंड देत होते. त्यातीलच एक रणरागिनी म्हणून कल्याणच्या आशा रसाळ यांची ओळख आहे. अशातच रसाळ यांनी मंगळवारी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरात देवीची पूजा करत देवीच्या गाभाऱ्यात महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शपथ घेत देवीला साकडे घातले आहे. त्या म्हणाल्या, ‘आज महाराष्ट्रावर संकट आलेय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे. शिवसैनिक म्हणून, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धवसाहेब पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी अनवाणी राहीन. चप्पल घालणार नाही.’ आशा रसाळ यांनी ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर राज्यातील तमाम महिलावर्ग तसेच सामान्य जनतेला उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन रसाळ यांनी केले आहे.