
मोदी सरकार उद्योगपतींचे सरकार
वाडा, ता. २२ (बातमीदार) : मोदी सरकारमुळे देशात महागाई वाढली आहे. राज्यघटना संपवण्याचे काम मोदी सरकार करीत असून ‘हम दो हमारे दो’ असे हे उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी केली.
वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी वाडा येथे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाची सुरुवात वाडा शहरात करण्यात आली. त्यावेळी पष्टे बोलत होते. यावेळी पराग पष्टे म्हणाले की, देशात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वसामान्य माणसांपर्यंत ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानातून घराघरात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या मनोगतातून मोदी सरकारवर टीका करून महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी खांद्याला खांदा लावून एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय औसरकर, कम्युनिस्ट पक्षाचे कल्पेश पाटील, शिवसेनेचे नेते निलेश गंधे, सत्यम ठाकूर आदींची भाषणे झाली. या अभियानात उद्धव ठाकरे गटाचे नेते उमेश पटारे, गोविंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील, सुरेश पवार, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील, बहुजन विकास आघाडीचे भोईर, काँग्रेसचे मनिष गणोरे, दिलीप पाटील आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्वप्रथम वाडा शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर तिचे छोट्याखानी सभेत रूपांतर झाले.