वाघबीळ, ओवळा नवे मेट्रो स्टेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघबीळ, ओवळा नवे मेट्रो स्टेशन
वाघबीळ, ओवळा नवे मेट्रो स्टेशन

वाघबीळ, ओवळा नवे मेट्रो स्टेशन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : गायमुख कासारवडवली ते वडाळा मेट्रो-४ या मेट्रोच्या कामासंदर्भात तसेच विजय गार्डनऐवजी वाघबीळ मेट्रो स्टेशन तसेच गोवन पाडा ऐवजी ओवळा मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांची आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली. आमदार सरनाईकांनी नामकरणाबाबत ग्रामस्थांची मागणी मांडल्यावर एमएमआरडीए आयुक्तांनी ग्रामस्थांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे वाघबीळ आणि ओवळा अशी मेट्रो स्टेशनची नावे राहणार असल्याचेही आमदार सरनाईक यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी वाघबीळ गाव व ओवळा गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विजय गार्डन मेट्रो स्टेशन नावाऐवजी वाघबीळ गाव मेट्रो स्टेशन व ओवळा येथील गोवन पाडा या मेट्रो स्टेशनचे नाव ओवळा मेट्रो स्टेशन करण्यासंदर्भात तीव्र भावना व्यक्त केल्‍या. ज्या भुमिपुत्रांनी आपल्या जमिनी कुठलाही मोबदला न घेता अथवा कवडीमोल भावाने सरकारला विकास कामासाठी दिल्यानंतर वाघबीळ व ओवळा गावाचे गावपण ही टिकणार नसेल तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, अशी भूमिका घेतली.
आयुक्‍तांच्‍या कार्यालयात बैठक
आमदार सरनाईक यांनी भूमिपुत्रांच्या रास्त मागणीचा विचार करून दोन्ही नावे बदलण्यासंदर्भात १७ फेब्रुवारी रोजी एमएमआरडीएच्या आयुक्तांना पत्र दिले होते. बुधवारी एमएमआरडीएच्या कार्यालयात आयुक्त श्रीनिवासन आणि आमदार सरनाईक यांच्यादरम्‍यान झालेल्या बैठकीमध्ये विजय गार्डन ऐवजी वाघबीळ मेट्रो स्टेशन तसेच गोवन पाडा ऐवजी ओवळा मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्यास एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांनी मान्यता दिली.