
ठाण्यात इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानाला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : घोडबंदर रोडवरील आझादनगर, ब्रह्मांड या ठिकाणी असलेल्या मे. माताजी ट्रेडर्स या इलेक्ट्रिक वस्तू असणाऱ्या दुकानाला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते. आग भरलोकवस्तीत लागल्याने एकच खळबळ उडाली. मे. माताजी ट्रेडर्स या तळ अधिक एकमजली इमारतीमधील इलेक्ट्रिक वस्तू असणाऱ्या दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कापूरबावडी पोलिस, वाहतूक नियंत्रण पोलिस, महावितरण आणि अग्निशमन दलाचे घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली, तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.