राऊतांच्या वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊतांच्या वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार : पालकमंत्री  शंभूराज देसाई
राऊतांच्या वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

राऊतांच्या वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करत खासदार संजय राऊतांनी स्वतःची सुरक्षा आणि स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. राऊत बोलायला लागले की, लोक टीव्ही बंद करतात, अशी टीका करत, त्यांना गांभीर्याने घेऊ नका, अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी ठाण्यात दिली. तसेच राऊतांनी चुकीच्या केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही देसाई यांनी या वेळी स्पष्ट केले.
ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे बुधवारी ठाणे दौऱ्यावर आले होते. या वेळी बोलताना त्यांनी राऊतांना गांभीर्याने घेऊ नका, असे म्हटले. खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करत त्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य केले असावे. असल्या फालतू वक्तव्याकडे वेळ देण्यासाठी वेळ नाही, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राऊतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे राऊतांचा स्वतःची सुरक्षा आणि महत्त्व वाढवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. सोबतचे राऊत हे बोलायला लागल्यानंतर लोक टीव्ही बंद करतात, अशा प्रकारचा टीकादेखील देसाई यांनी बोलताना केली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. शासनामार्फत हा निर्णय एमपीएससीला पाठवला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले टीकेल्या प्रत्युत्तर देत स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणत्याही गुंडांचा वावर आढळून आला नसल्याचे स्पष्टीकरण देसाई यांनी दिले. त्यांच्याकडे काही पुरावे असतील, तर पालकमंत्री या नात्याने त्यांनी माझ्याकडे द्यावे, असेही त्यांनी म्हटले.

------
आनंद आश्रमाची निवड
कार्यकारिणी बैठकीत शिवसेना पक्ष कार्यालय म्हणून आनंद आश्रमाची निवड करण्यात आली आहे, यावर बोलताना पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, तसेच कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचा कामकाज चालत असेल, तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही.