
सीबीडीतील महिलेचे दागिने लुटले
नवी मुंबई (वार्ताहर) : पारसिक हिल येथून मॉर्निंग वॉक करून बेलापूर गावाकडे परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचल्याची घटना घडली आहे. या प्रकाराची सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेलापूर गावात राहणाऱ्या रेणुका शितोळे (वय-४४) नेहमीप्रमाणे पारसिक हिल येथे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यानंतर आठच्या सुमारास मॉर्निंग वॉक करून पारसिक हिलमार्गे अपोलो हॉस्पिटल येथून एचपी पेट्रोल पंपाजवळून आयकर कॉलनी मार्गे बेलापूर गावात जात होत्या. यावेळी आयकर कॉलनीतील संकल्प भवनसमोर काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या हेल्मेटधारीने शितोळे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचले. यावेळी मंगळसूत्राचा काही भाग लुटारूंच्या हातात गेला; तर काही भाग रेणुका यांच्या गळ्यात राहिला होता. त्यामुळे शितोळे यांनी आरडाओरड केला. मात्र, तोपर्यंत लुटारू भरधाव वेगात पळून गेले होते.