
संपामुळे कुपोषणाची छाया गडद
भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २३ : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाही सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे कुपोषणग्रस्त पालघर जिल्ह्यातील तीन हजार ३०० अंगणवाड्यांना टाळे लागले आहेत. कुपोषण निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या अंगणवाडी सेविका संपावर गेल्याने कुपोषित बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांचा पोषण आहार बंद झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुपोषणग्रस्त असलेल्या पालघर जिल्ह्यात कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडी सेविकांची महत्त्वाची भूमिका आहे. किशोरवयीन मुली, गर्भवती, स्तनदा माता आणि कुपोषित बालके यांची सर्व माहिती अंगणवाडी सेविका घेत असते. तसेच कुपोषित बालके आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका पार पाडते. हीच जबाबदारी कसोशीने पार पाडल्याने, पालघर जिल्ह्यात काही अंशी कुपोषणाला आळा बसला आहे; पण अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना टाळे लागले आहे. तसेच कुपोषित बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांचा पोषण आहार बंद झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा मुख्यालयाला मोर्चा काढला होता. मात्र, त्याची शासन आणि प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. याचा मोठा परिणाम कुपोषित बालके, गरोदर आणि स्तनदा मातांच्या आरोग्यावर होणार आहे. हा आहार बंद झाल्याने जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात पुन्हा कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहेत मागण्या?
वाढत्या महागाईचा विचार करून मानधनात दुप्पट वाढ करणे, निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन, बालकांना शिजवून देण्याच्या आहारदरात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील तीन हजार ३०० अंगणवाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे चार दिवसांपासून कुपोषित बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना देण्यात येणारा पोषण आहारही बंद झाला आहे.
....
राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका संपावर आहेत. मोखाड्यातील २२९ अंगणवाड्यांपैकी खोडाळा भागातील ७० अंगणवाडी सेविका संपात सहभागी झालेल्या नाहीत. या ठिकाणी नियमित कारभार सुरू आहे; तर मोखाडा भागातील १५९ अंगणवाडी सेविका संपावर आहेत. त्यामुळे या भागातील पोषण आहार व इतर अंगणवाडीच्या सुविधा बंद झाल्या आहेत.
- कुलदीप जाधव, बालविकास अधिकारी, मोखाडा