
पशुवैद्यकीय दवाखान्यात ना वीज ना पाणी
भाईंदर, ता.२३ (बातमीदार) : भाईंदरजवळील मूर्धा गावात असलेल्या जिल्हा पशू संवर्धन विभागाच्या पशू वैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे. या दवाखान्याच्या देखभाल दुरुस्तीवर राज्य सरकारकडून लाखो रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही दवाखान्यात वीज व पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे दवाखाना सुरू करण्याचे आदेश असतानाही तो सुरू होऊ शकलेला नाही.
पाळीव तसेच भटक्या जनावरांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाकडून मूर्धा गावात पशू वैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला आहे. पण हा दवाखाना गेल्या सहा ते सात वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांना त्यांनी पाळलेल्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी खासगी दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे हा दवाखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहारही करण्यात आला. त्यानंतर मधल्या काळात बंद असलेल्या दवाखान्यावर पशू संवर्धन विभागाने तब्बल २१ लाख रुपये खर्च करून त्याची दुरुस्ती केली. पण त्यानंतरही दवाखाना बंदच राहिला, त्यामुळे नागरिकांनी पुन्हा तक्रारी केल्या त्यानंतर काही दिवसांपूर्वीच दवाखान्यासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर नियुक्त करून दवाखाना सुरू करण्यात येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाने जाहीर केले. मात्र दवाखाना उघडल्यानंतर त्यात वीज व पाणीच उपलब्ध नसल्याचे समोर आले. शिवाय दवाखान्याची भिंत तोडून त्यात अतिक्रमणही झाल्याचे तसेच दवाखान्याच्या काही भागात पत्रेच नसल्याचे दिसून आले.
पशुसंवर्धन आयुक्तांकडेच तक्रार
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते श्रेयस सुहास सावंत यांनी थेट पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तांकडेच तक्रार केली. दवाखान्यावर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही दवाखान्याची अशी दुरवस्था झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली अन्यथा दवाखान्याबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. या तक्रारीनंतर वेगाने चक्रे फिरली व ठाणे जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी दवाखान्याची पाहणी करण्यासाठी उपस्थित झाले. यावेळी सावंत यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांना दिसून आले. दवाखान्याचा वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांनी केल्या. त्याचप्रमाणे कार्यालयीन नोंदवह्या अद्ययावत करून दवाखान्यात येणाऱ्यांना पशुवैद्यकीय सेवाही पुरवण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी श्रेयस सावंत, माजी नगरसेवक रोहित सुवर्णा तसेच निखिल पाटील उपस्थित होते.