अभय योजनेतून महापालिकेला लक्ष्मी दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभय योजनेतून महापालिकेला लक्ष्मी दर्शन
अभय योजनेतून महापालिकेला लक्ष्मी दर्शन

अभय योजनेतून महापालिकेला लक्ष्मी दर्शन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार अभय योजना पुढे आणली असून मागील वर्षभरात या योजनेतून ९,१९२ अनधिकृत नळ जोडणी कायदेशीर करण्यात आली आहे. त्यापोटी पाच कोटी ५७ लाखांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे; तर २०११ ते २०२२ या कालावधीत तब्बल ३८,५२५ नळ संयोजनांना पाण्याचे बिल आकारण्यात आले असून तिजोरीत २८ कोटी ९५ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाण्यातील दिवा, मुंब्रा, कळवा आदींसह इतर भागात अनधिकृतपणे, तसेच चोरीच्या उद्देशाने पाणी कनेक्शन घेतले जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. त्यांच्याविरोधात पालिकेने वारंवार कारवाई केली आहे; परंतु कारवाई करूनही पाणी चोरी कमी होत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पालिकेचे नुकसान होत होते. त्यामुळे अशा घटनांना आळा बसविण्यासाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय २०११ मध्ये घेण्यात आला होता. दरवर्षी या योजनेंतर्गत अनधिकृत नळ संयोजनावर बिल व प्रशासकीय कर आकारला जात असून त्यानुसार वसुली केली जात असल्याचे महापालिकेने सांगितले. १ एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत ९,१९२ नळ संयोजनांवर अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्यात कळवामध्ये सर्वाधिक ६,४९२, त्या खालोखाल मुंब्रा एक हजार दोन आणि दिव्यातील ७६६ नळ संयोजनांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.

पाणी चोरी-गळतीला आळा
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून २०११ पासून अभय योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत अनधिकृतपणे पाण्याचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे पाणी चोरी आणि गळतीला आळा बसला जात असल्याचा दावा पालिकेने केला.

तीन महिने मुदतवाढ
अभय योजनेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या योजनेला पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वर्ष एकूण कनेक्शन प्रशासकीय कर आणि बिल
२०११ १,२४,७११ ३,८२,३७,६५०
२०१३ १,४४,७६४ ३,८२,५७,०३४
२०१४ १,५३,०२१ २,५१,९६,५००
२०१५ १,६४,११५ ४,१८,७८,९४०
२०१८ १,९४,७७८ २,१६,७३,९५३
२०१९ २,०५,९२७ ५,५०,८६,२४०
२०२० २,१२,००७ १,३४,६८,२५०
२०२१ २,२९,१९२ ५,५७,३५,५००