
ॲपच्या माध्यमातून दुचाकी प्रवासी वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईत नवनवीन ॲपद्वारे दुचाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. नुकतेच रॅपिडो प्रकरणात उच्च न्यायालयाने प्रवासी वाहतुकीला स्थगिती दिली आहे; तर सुप्रीम कोर्टाने दुचाकीने प्रवासी वाहतूक करण्यासंदर्भात ठोस पॉलिसी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यानंतर मुंबईत नवनवीन कंपन्यांकडून न्यायालयाचा अवमान करत दुचाकी प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने अशा प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांसाठी पॉलिसी निर्माण करण्याची मागणी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने केली आहे.
सीएनजी गॅसच्या सततच्या दरवाढीमुळे ऑटो रिक्षाचालक आधीच अडचणीत सापडला आहे, त्यात ॲपद्वारे दुचाकी प्रवासी वाहतुकीमुळेही रिक्षाचालक आणखी अडचणीत सापडल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे. राज्यामध्ये सुमारे ९.५ लाख ऑटोरिक्षा आहेत व सुमारे १४ लाखांहून अधिक स्वयंरोजगारीत ऑटोरिक्षा चालक-मालक असून, मुंबईसारख्या मोठ्या महानगरातील ॲपच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षा व्यवसाय देशोधडीला लागला असल्याचे संघटनेकडून सांगितले जात आहे. दरम्यान, राज्य शासनाने ॲपच्या माध्यमातून टॅक्सी प्रवासी वाहतुकीसाठी सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.