
पालघरमधील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी
पालघर, २५ (बातमीदार) : जिल्ह्यात खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, हे खेळाडू विविध खेळ प्रकारात राष्ट्रीय राज्य पातळीवर आज पालघर जिल्ह्याचे नाव उंचावत आहेत. बोईसर कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शालेय खेळाडूंना गेल्या सोळा वर्षापासून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या महोत्सवातून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू नक्कीच चमकदार कामगिरी करतील, अशी अशा सामाजिक कार्यकर्ते जगदीश धोडी यांनी सोळाव्या बोईसर कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना व्यक्त केली.
कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षे या महोत्सवाचे आयोजन होऊ शकले नव्हते, मात्र शुक्रवारी सोळाव्या कला क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते जगदीश धोडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲकॅडमीचे अध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष डेरेल डिमेलो, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे, पंचायत समिती सदस्य अजय दिवे, प्रज्ञा राऊत, गजानन देशमुख, हेमंत मुंजे, डॉन बॉस्को शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अनुजा जोसेफ, ॲड. कल्पेश धोडी संतोष चुरी आदी उपस्थित होते.
बोईसर कला क्रीडा महोत्सवामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी आणि खुल्या गटांमध्ये महिलांसाठी विविध क्रीडा प्रकाराचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विविध वयोगटाच्या एकूण १२८ स्पर्धा तीन दिवसीय महोत्सवामध्ये होणार आहेत. सुमारे बारा हजाराच्या वर खेळाडू यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. परीक्षेच्या काळ असल्यामुळे बरेचसे क्रीडा व सांस्कृतिक प्रकार कमी करण्यात आले, असे ॲकॅडमीचे कार्याध्यक्ष डेरेल डिमेलो यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी ॲकॅडमीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सुद्धा खेळाडूंना मार्गदर्शन केले.
...
विविध स्पर्धांचे आयोजन
तीन दिवसीय महोत्सवामध्ये लेझीम स्पर्धा, सामूहिक कवायत, मार्च पास, पिरॅमिड, मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील वकृत्व स्पर्धा, लंगडी, महिलांसाठी थ्रो बॉल, समूहगीत, लोकनृत्य, व्हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, कराटे, चित्रकला, शुभेच्छा कार्ड, मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील हस्ताक्षर स्पर्धा, वेशभूषा, मेहंदी, नेल आर्ट एकपात्री अभिनय, कॅरम, बुद्धिबळ, तीन भाषांमध्ये कथाकथन, भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बोईसर येथील डॉन बॉस्को शाळेच्या मैदानावर संपन्न होत आहे.
..
पालघर : कला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थिनींनी लेझीमची प्रात्यक्षिक सादर केले.