
रेल्वे मार्गाच्या दुतर्फा कुंपण
बोर्डी, ता. २७ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील घोलवड उंबरगाव रेल्वे स्थानकादरम्यान कुंपण घालण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. जलद गतीने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर पूर्वीपासून धावणाऱ्या राजधानी, जम्मू तावी एक्स्प्रेस अशा वेगवान गाड्यांमध्ये आता वंदे भारत गाडीची भर पडली आहे. या गाड्यांना मोकाट गुरांचा अनेक ठिकाणी अडथळा निर्माण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने तातडीने निर्णय घेऊन रेल्वे मार्गाच्या दुतर्फा कुंपण घालण्याचा आदेश देण्यात आले होते. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून रेल्वेमार्गाच्या दुतर्फा लोखंडी खांब लावण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच या खांबांना लोखंडी पट्ट्या लावण्यात येतील, अशी माहिती सूत्राने दिली.