
पडघ्यात ‘सॅम मॅम’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पडघा, ता. २५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे आयोजित ‘सॅम मॅम’ या बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुका वैद्यकीय विभाग, पंचायत समिती भिवंडी व जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वैद्यकीय शिबिर पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पंटागणात घेण्यात आले. या वेळी उद्घाटक म्हणून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे; तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, म्हाप्रळकर फाऊंडेशनचे सुहास म्हाप्रळकर, एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली दाभाडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत सदावर्ते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव वाघमारे, पडघा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती गावडे उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील १३८ बालकांची तपासणी करून औषधे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधव वाघमारे यांनी; तर सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण यांनी केले.