
उल्हासनगरचा लवकरच कायापालट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासह, बगीचे, आरोग्य केंद्र, जॉगिंग ट्रॅक, विद्युत दिवे बसविणे, समाजमंदिर उभारणे, नाले उभारणी, अभ्यासिका यांसह उल्हासनगरचा कायापलट करणाऱ्या अनेक विकासकामांचा समावेश आहे. या मूलभूत विकासकामांमुळे उल्हासनगरमधील नागरिकांना दिलासा मिळणार असून शहरांच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
औद्योगिक उत्पादनामुळे महाराष्ट्राचे यूएस अशी ओळख उल्हासनगरला मिळाली खरी; मात्र हे शहर ओळखले जाते ते येथील दाटीवाटीमुळे आणि बकालपणामुळे. विकासकामांची या शहरात बोंब असून चालण्यासाठी धड पदपथही नाहीत. शहरात सुस्थितीत रस्तेही नाहीत. मात्र, या शहराचा कायापालट करून उल्हासनगरला विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगर शहरातील अनेक कामे प्रगतिपथावर येणार असून, नागरिकांना काँक्रीटचे रस्ते, बगीचे, महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. याला जोड म्हणून राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून त्यांनी नगरविकास विभागाकडून तब्बल ४७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
विकासकामांना मिळणार गती...
- नव्याने उपलब्ध झालेल्या निधीतून उल्हासनगर शहरात सार्वजनिक शौचालय उभारणे, महिलासांठी स्वतंत्र शौचालय, नाल्यांची उभारणी करणे, गटार बांधणे, संरक्षण भिंत उभारण्याची कामे होणार आहेत.
- रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, नवीन रस्ते उभारणी, पदपथ तयार करणे, समाजमंदिर तयार करणे, अभ्यासिका, बगीचा उभारणे, आरोग्य केंद्र, जॉगिंग ट्रॅक, बाकडे बसविणे, विद्युत दिवे बसविणे, पत्र्यांचे शेड उभारण्यात येणार आहेत.
-कल्व्हर्ट दुरुस्ती करून पायवाट तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय ड्रेनेजची कामेही करण्यात येणार आहे.
- सुशोभीकरणाची कामे हातात घेऊन बुध्दविहार उभारणे, पाईपलाईन टाकणे, सभामंडप उभारणे, कुंपण उभारणे, साकव बांधणे, सुविधा आणि साधनसामग्रीयुक्त व्यायामशाळा उभारणे, शहरांतील दिशादर्शक फलक उभारणे, जुन्या दिशादर्शकांचे सुशोभीकरण करणे यांसारखी कामे होणार आहे.