
मुलांनी मांडली कल्पनेतली शाळा
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः शाळा या शब्दात खरे तर एक जिव्हाळा आणि आदर आहे. विद्यार्थ्यांचे अख्खे विश्वच या एका ठिकाणी सामावलेले असते. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. समाजाच्या, देशाच्या जडणघडणीत शाळेचा मोठा हातभार असतो म्हणूनच ज्या शाळेत नागरिकांचा भक्कम पाया रचला जातो, त्या शाळा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे. शाळेच्या अशाच कल्पनेतून घाटकोपरच्या नालंदानगर येथील ज्ञानमंदिर हायस्कूल शाळेच्या इयत्ता पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाल विज्ञान प्रदर्शनात ‘आमच्या कल्पनेतील शाळा’ याचे सुरेख प्रदर्शन मांडले. पुठ्ठे आणि कागदाचा वापर करत विद्यार्थ्यानी तीनमजली इमारतीत आपली शाळा कशी असावी, याची सुंदर मांडणी केली आहे
शनिवारी (ता. २५) नालंदा येथील ज्ञानमंदिर हायस्कूल येथे एकदिवसीय बाल विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे संस्थापक अनिल झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यानी यावेळी विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडले. या वेळी टाकाऊपासून टिकावू, सौरऊर्जा, डे अँड नाईट, ज्वालामुखी उद्रेक, क्षेपणास्त्र उड्डाण, वॉटर हार्वेस्टिंग, धूम्रपान निषेध, पार्किंग उपाय अशा विविध संकल्पनेवर प्रदर्शन सादर करण्यात आले. या प्रदर्शनाला एन वॉर्ड सहायक आयुक्त संजय सोनवणे, शाळेचे संस्थापक अनिल झोरे, शिवसेनेचे विभागप्रमुख परमेश्वर कदम, सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे आदींनी भेट दिली.
विद्यार्थ्यांचे आयुक्तांना साकडे
बाल विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी आमच्या कल्पनेतील शाळा, या विषयावर तीनमजली इमारत साकारून आपली शाळा प्रदर्शित केली. या शाळेत मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान, संगणक वर्ग, शिक्षक, प्राचार्य आणि संस्थापक यांना बसण्यासाठी ऐसपैस रूम, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शौचालय, विद्यार्थ्यांसाठी रंगीत वर्ग, वाचनालय, विज्ञान वर्ग, चित्रकला वर्ग असे या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडले. या वेळी विद्यार्थ्यांनी आम्हालादेखील अशी शाळा हवी, असे प्रदर्शन पाहण्यास आलेल्या एन वार्डचे सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्याकडे विनंती करताना साकडे घातले.
मुलांनी सुरेख प्रदर्शन मांडले आहे. त्यातल्या त्यात आमची शाळा कशी असावी, या विषयावर विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रदर्शन खरोखरीच सुरेख आहे. शाळेने या विद्यार्थांचा लेखी निवेदनाचा प्रस्ताव माझ्याकडे दिल्यास मी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून त्याबाबत सुचवू शकतो.
– सहायक आयुक्त, संजय सोनवणे