
कल्याणमध्ये पोलिस ठाण्यात वृद्धाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात मुलाची सोडवणूक करायला गेलेल्या वृद्ध वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) रात्री घडली. दीपक भिंगारदिवे (६३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे; परंतु पोलिसांनी मारहाण केल्याने दीपक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले असून, याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रशिक भिंगारदिवे (२३) याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. प्रशिकला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वडील दीपक यांना मिळाल्याने ते दुसरा मुलगा गौरव याच्यासह कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आले. प्रशिकची चौकशी सुरू असताना दीपक हे छायाचित्रण करत होते. तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जतही घालत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ठाणे अंमलदार कक्षाच्या पाठीमागे बसविले. याचवेळी ते खाली कोसळले. त्यांना त्वरीत रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.
हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यातील सीसी टीव्हीमध्ये कैद झाला आहे. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, सीआयडी अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली असल्याची माहिती उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
‘आम्हाला न्याय हवा’
भिंगारदिवे कुटुंब कल्याण पूर्वेत रहाण्यास आहेत. दीपक भिंगारदिवे यांचा मुलगा प्रशिक हा बजाज फायनान्स कंपनीमध्ये रिकव्हरी विभागात काम करतो. ‘वडील माझी विचारपूस करून माझा व्हिडीओ काढत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना मारहाण केली व त्यांना दुसरा पोलिस फरपटत घेऊन गेला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिस सांगतात आकडी आल्याने त्यांचा मृत्यू झाला; परंतु त्यांना कधीही आकडीचा त्रास नव्हता. आम्हाला न्याय हवा आहे’, असे दीपकने सांगितले.
ही मगरुरी कशामुळे आली : जितेंद्र आव्हाड
दीपक यांच्या पत्नी नंदा या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत. या प्रकरणाची दखल राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घेत यासंबंधी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ‘पोलिसांनी पोराला ताब्यात घेतले. पोराची काळजी म्हणून बाप सोडवायला गेला. सोडविणे राहिले बाजूला, त्यांना इतके मारले की काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ही कोणत्या प्रकारची दादागिरी आहे. ते स्वतः गुन्हेगार नाही, पोरगा गुन्हेगार नाही. तरीही त्यांचा जीव गेला. ही मगरुरी ठाण्यात कशामुळे आली. कायदा बाजूला ठेवला आहे. कायद्याची सगळी पुस्तके मुंब्रा खाडीत जाळे टाकले तर मिळतील’, अशी प्रतिक्रीया आव्हाड यांनी दिली आहे.