
पुरस्कार वितरणावरून शिक्षक नाराज
मुंबई, ता. २५ : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या राज्य क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे वितरण मुंबईत रंगशारदा येथे झाले; मात्र वितरणाच्या पद्धतीवरून शिक्षक नाराज झाले आहेत.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊ शकले नाहीत. शालेय शिक्षण मंत्रीही आजारपणामुळे प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमाला आलेले पालकमंत्री मंगलप्रभात लोढाही मध्येच दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेले. त्यानंतर उरलेल्या शिक्षकांना रांगेत बोलावून शिक्षक आमदारांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. त्यामुळे शिक्षक संघटनांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण विभागाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे वितरण करण्यासाठी ३ जानेवारीचा कार्यक्रम पुढे ढकलून तो २४ फेब्रुवारीला मुंबईत आयोजित केला होता.