
चोरी रोखण्यासाठी स्मार्टफॉग
मुंबई, ता. २६ ः गोदरेज सिक्युरिटीज सोल्युशनने चोरी, दरोडेखोरी रोखण्यासाठी स्मार्टफॉग आणि सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी अॅक्यूगोल्ड ही दोन आधुनिक उत्पादने बाजारात आणली आहेत.
सोन्याचे दागिने घडवणाऱ्या ठिकाणी, तसेच मौल्यवान वस्तू ठेवण्याच्या तिजोऱ्यांच्या ठिकाणी सुरक्षा उपकरणांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने स्मार्टफॉग उपकरण उपयुक्त असल्याचे गोदरेज सिक्युरिटीज सोल्युशनचे व्यवसाय प्रमुख पुष्कर गोखले म्हणाले.
कोणतीही तिजोरी अनधिकृतपणे उघडण्याचा प्रयत्न झाल्यास स्मार्टफॉग यंत्रणेद्वारे ते लगेच कळते. त्यानंतर फॉग यंत्रणा सुरू करण्यासाठी रिमोट क्लाऊडवर आधारित ॲप आणि वायरलेस तंत्रज्ञान वापरता येते. ती यंत्रणा सुरू केल्यावर द्रवरूप ग्लायकॉलपासून बनलेले दाट धुके परिसरात पसरते. त्यामुळे समोरचे काहीही न दिसल्यामुळे गुन्हेगार हतबल होतात, हा धूर माणसांसाठी निरुपद्रवी आहे; तर अॅक्यूगोल्ड हे सोन्याची शुद्धता तपासणारे सर्वात प्रगत आणि अचूक यंत्र आहे. हे दागिन्यांचे कोणतेही नुकसान न करता त्यांच्यातील शुद्धतेचे प्रमाण तपासते. त्यामुळे सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या बँका, दागिने व्यावसायिक, तसेच वित्तसंस्था यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, असेही गोखले म्हणाले.
कंपनीने प्रिमायसेस सिक्युरिटी सोल्यूशनच्या व्यवसायात वीस टक्के वाढ नोंदविली आहे. देशाच्या पश्चिम भागाबरोबरच दक्षिण आणि उत्तर विभागातही व्यवसाय वाढत आहे. कंपनीने नव्या उत्पादनांच्या संशोधन आणि विकासात (आरअँडडी) दोन कोटी रुपये गुंतविले आहेत; तर पुढील दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता यावरील खर्चात तीस टक्के वाढ केली जाईल.
- पुष्कर गोखले, व्यवसाय प्रमुख, गोदरेज सिक्युरिटीज सोल्युशन