
मुंबईत दररोज सरासरी चार स्वाईन फ्लू रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी कोविडच्या लक्षणांसह पालिका रुग्णालयात उपचारांसाठी पोहोचणारे रुग्ण स्वाईन फ्लूने त्रस्त असल्याचे आढळून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णांची प्रथम कोविड चाचणी केली जाते. यामध्ये हे रुग्ण निगेटिव्ह आढळून आले, तरी स्वाईन फ्लू चाचणीत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात दररोज सरासरी चार स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत.
गेल्या दोन वर्षांत कहर करणारा कोरोना आता नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही अनेक देशांमध्ये होत असताना, पालिकेने त्याची स्क्रीनिंग प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यामुळेच सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, जुलाब, श्वास घेण्यास त्रास अशा लक्षणे असणाऱ्या रुग्णांची सर्वप्रथम रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी केली जाते. या चाचणीत रुग्ण निगेटिव्ह आढळल्यास त्यांची स्वाईन फ्लू, डेंगी आदींची तपासणी केली जाते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या ५४ दिवसांत स्वाईन फ्लूचे २३४ रुग्ण आढळले; तर डेंगीचे ५४ आणि मलेरियाचे ३५ रुग्णही आढळून आले आहेत.
पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, कोविड आणि इतर डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या लक्षणांसारखीच आहे. पण, तीव्रता आणि अस्वस्थतेसह अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आपल्याला रोगाचे अचूक निदान आणि उपचार करण्यास मदत करतात. २००९ च्या स्वाईन फ्लू महामारीपासून इन्फ्लूएंझा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे.
स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या चिंताजनक नाही, कारण हा महामारीचा उद्रेक नाही. दर वर्षी राज्यभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळतात; मात्र या वेळी हवेची खराब गुणवत्ता मोठी भूमिका बजावत आहे. कोणता विषाणू वाढत आहे आणि लोकांना आजारी बनवत आहे, हे स्पष्ट नाही.
- डॉ. विक्रांत शहा, संसर्गजन्य रोग विशेषज्ज्ञ
आरोग्य विभाग सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आजार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आराखडा वाढवण्यात आला आहे. जर एखाद्या रुग्णाला व्हायरल न्यूमोनियाने रुग्णालयात दाखल केले असेल, तर सर्वात सामान्य कारण कोविड किंवा स्वाईन फ्लूचे विषाणू असू शकतात.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी