मालाडमध्ये साई भंडारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाडमध्ये साई भंडारा
मालाडमध्ये साई भंडारा

मालाडमध्ये साई भंडारा

sakal_logo
By

मालाड, ता. २७ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील शंकर गल्ली येथे फ्रेंड्स असोसिएशच्या वतीने साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्यात जवळपास पाचशे ते सहाशे भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी अनेक मान्यवर व्‍यक्‍ती, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधीही आवर्जून उपस्थित होते, अशी माहिती कृष्णा वाघमारे यांनी दिली.

धारावीत सावरकर पुण्यतिथी
धारावी, ता. २७ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमांतर्गत देशभरात वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हार व फुले अर्पण करून भाजपतर्फे आदरांजली वाहण्यात आली. वॉर्ड क्रमांक १८४ तर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये मुंबई भाजपचे सचिव मनी बालन, धारावी भाजपचे संयोजक गोवर्धन चव्हाण, धारावी महिला मोर्चा अध्यक्षा अनिता व्हटकर, कार्यक्रमाचे आयोजक वॉर्ड महामंत्री दुर्गाप्रसाद यांच्‍यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

सचिन म्हात्रे यांचा ‘राज्य शिक्षक गुणगौरव’ पुरस्काराने सन्मान
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः राज्य शासनाच्या वतीने दिल्‍या जाणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात करण्यात आले होते. मुंबईतील ऊर्जा फाऊंडेशनचे विश्वस्त तथा हरहुन्नरी असलेले शिक्षक सचिन म्हात्रे यांना या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी प्रशासनातील अनेक मान्यवर राजकीय मंडळी व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तथा ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॅा. विजय जंगम (स्वामी) आदी उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सचिन म्हात्रे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

घाटकोपरमध्‍ये काँग्रेसचे ‘हात जोडो’ अभियान
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ब्लॉक क्रमांक १३१ च्या वतीने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्राहम राय मणी यांच्या मार्गदर्शनाखाली हात जोडो अभियानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. लक्ष्मीबाग विठ्ठल मंदिर येथे ब्लॉक १३१ चे अध्यक्ष विदेश पाल सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशानंतर आता हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे. या वेळी सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना पत्रकांचे वाटप केले. या कार्यक्रमास मनीषा सूर्यवंशी, मुकीम शेख, बलदेव नागणे, स्मिता खातू, सविता कांबळे, सविता पोलबी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. प्रभा शर्मा यांना हिंदी अकादमीचा पुरस्कार
मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः कवयित्री, साहित्यिक आणि मुलुंडच्या राजीव गांधी विद्यालयातील वरिष्ठ शिक्षिका डॉ. प्रभा शर्मा सागर यांना राष्ट्रीय हिंदी विकास परिषदेत साहित्यातील विशेष योगदानाबद्दल डॉ. महाराज कृष्ण जैन स्मृती पुरस्कार देण्यात आला. ईशान्य हिंदी अकादमी शिलाँगतर्फे आगरतळा येथे आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सत्यदेव पोद्दार यांच्या हस्ते डॉ. प्रभा शर्मा यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी मुंबईतील सुवर्णा जाधव, आभा दवे, ज्योती गजभिये तसेच देशातील १८ राज्यांतील साहित्यिक, कवी, कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमात १० पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

‘वीर सावरकर-ज्ञान योद्धा’ व्याख्यानाला उत्‍स्फूर्त प्रतिसाद
शिवडी, ता. २७ (बातमीदार)ः अभिनव केसरी मित्र मंडळाच्या वतीने डोंगरी येथील बाल सुधारगृहाच्या प्रांगणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘वीर सावरकर-ज्ञान योद्धा’ या व्याख्यानाचे आयोजन रविवारी (ता. २६) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतोष गांगण यांनी प्रास्ताविक केले; तर शिवांश या लहान मुलाने ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अजरामर गीत सादर केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले निवृत्त मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांनी आपले मत व्‍यक्‍त केले. त्याचबरोबर इतिहासकार प्रमुख वक्ते मल्हार गोखले यांनी सावरकरांच्या आजपर्यंत न उलगडलेल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या वेळी अभिनव केसरी मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन दरेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.