
उरण शहरातील रस्ते फेरीवाल्यांना आंदण
उरण, ता. २६, (बातमीदार) ः उरण शहरातील रस्त्यांवर बेकायदा फेरीवाल्यांनी संसार थाटले आहेत. नगरपरिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक निद्रावस्थेत असल्यामुळे गेले अनेक महिने या फेरीवाल्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे रस्त्यांवर चालताना नागरीकांना आणि वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सद्या वर्षाअखेरीचे कामे सुरु आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कारवाई करू असे नगरपरिषद प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईशेजारच्या समुद्र किनारी वसलेल्या उरण नगरपरिषदेने अद्याप शहरातील रस्ते आणि पदपथाबाबत धोरण आखलेले नाही. रस्त्यांबाबत नगरपरिषदेने कागदावर नियोजन केले आहे. मात्र हे नियोजन अस्तित्वात येण्याआधी हे रस्ते फेरीवाले गिळंकृत करतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शहरातील देऊळवाडी ते मोरा या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. राजपाल नाका ते उरण चार फाटा या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेरीवाले, दुकानदारांनी जागा हडप केल्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवण्यासाठी रस्ता उरलेला नाही. राजपाल नाका ते राघोबा मंदिरापर्यंत रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. उरणमधील कोट नाका रस्त्याशेजारी असणाऱ्या दुकानदारांनी कब्जा केला आहे. हा रस्ता आधीच अरुंद झाला असताना रिक्षा चालकही या रस्त्याच्या शेजारी उभे राहत असल्यामुळे नागरीकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. महाराष्ट्र स्विस ते कोठारी ज्वेलर्स, मराठा मंदिर ते गांधी चौक, उरण बाजारपेठेतील इतर सर्व रस्ते नागरिकांसाठी कमी आणि फेरीवाल्यांसाठीच नगरपरिषदेने बांधले आहेत का, असा भास होतो.
-------------------------
महापालिकाच देते आशीर्वाद
उरण शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेतर्फे रितसर पावती फाडून आशीर्वाद देताना दिसून येते. शहरात प्रशासनाने हॉकर्स झोन जाहीर केलेला नाही. तरी सुद्धा रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना कारवाई करण्याऐवजी महापालिका पावती फाडून प्रत्यक्षरित्या पाठिंबाच देते. रविवारी उरण येथे आठवडा बाजार भरतो. तेव्हा सर्व ठेलेवाले, हातगाडी वाले रस्त्यावर दुकाने थाटत असतात. असा परिस्थितीत उरण शहरात वाहतूक कोंडी होते.