
ठाकरे म्हणजेच शिवसेना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः ठाकरे म्हणजे मातोश्री, ठाकरे म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना; पण भाजपचे नेते जाहीर सांगत होते की शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार आणि तसेच झाले. कारण निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाची स्क्रिप्ट भाजप कार्यालयातच लिहिली गेली, अशी जोरदार टीका ठाकरे गटाच्या नेत्यांनी ठाण्यात शिवगर्जना मेळाव्यात केली. या मेळाव्याला शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव, राजन विचारे, केदार शिंदे आदी उपस्थित होते.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा शिवगर्जना मेळावा झाला. शनिवारी (ता. २५) या पार्श्वभूमीवर शहरात बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच शहरातील शेकडो ज्येष्ठ शिवसैनिकांसह ठाणेकरांनी गडकरी रंगायतनमध्ये हजेरी लावली. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली आणि शिवसेनेतील बंडाला सुरुवातही ठाण्यात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाण्याचेच असल्याने ठाकरे गटाने आपल्या प्रत्येक अभियानाची सुरुवात ठाण्यातूनच करण्याचे योजले आहे. ठाकरे गटाची ही योजना मेळाव्यात तरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. कारण महाप्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसाच शिवगर्जना मेळाव्यालाही मिळाला. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर आणि भाजपवर कठोर शब्दांत टीका केली.
या वेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, निवडणूक आयोगाने केवळ घटनेचा, लोकशाहीचाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विश्वासघात केला आहे. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. भाजपला हा निकाल आधीच कसा कळला, असा सवालही जाधव यांनी केला. यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी नगरसेवक नरेश मणेरा, मनोहर मढवी, नंदिनी विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
----
ठाकरे हेच पक्ष आणि निशाणी
उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आपला पक्ष आणि तीच आपली निशाणी हे ध्यानात ठेवून कामाला लागा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. ठाण्यातील शिवसैनिक एकनिष्ठ असून सर्व्हेनुसार पालिकेपासून खासदारकीपर्यंत कोणतीही निवडणूक झाली तरी विजय ठाकरे गटाचाच होणार, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.