
होळीनिमित्त पर्यटननगरी सजली
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२७ : अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण आल्याने बाजारपेठा विविध रंगांसह पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत. यंदा रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंग विक्रीसाठी आल्याचे चित्र पहावयास मिळत असून रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा आत्तापासूनच विविध रंगांनी सजल्या आहेत. शिवाय समुद्र किनाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे.
कोकणात धुळवड मोठ्याप्रमाणात साजरी केली जाते, त्याचबरोबर रंगपंचमीही साजरी केली जाते. हे दोन्ही दिवस रंगात भिजून साजरे केले जात असल्याने त्यासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विमान, बंदूक, पक्षी, फोन, कार्टून आदींच्या आकारात पिचकाऱ्या विक्रीसाठी आल्या असून त्यांची मागणी वाढली आहे. अलिबाग, वरसोली, काशीद, दिवेआगर या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले असतात, त्यांच्या मागणीमुळे तेथील दुकानदारांनी रंगाचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. तसेच विविध आकाराच्या पिचकाऱ्याही बाजारात उपलब्ध असून विक्रीसाठी नैसर्गिकसह रासायनिक रंगांचा देखील समावेश आहे.
--------------------------------------------
रासायनिक रंग त्वचेला घातक
लाल, हिरवा, पिवळा अशा साध्या रंगाचे पॅकेट व सुटे रंगही बाजारात उपलब्ध आहेत. नैसर्गिक रंगामध्ये ३०० ग्रॅमचे पॅकेट १०० रुपयांपर्यंत आहे. अनेक कंपन्यांचे नैसर्गिक रंग बाजारात विक्रीसाठी आले आहेत. या रंगाबरोबरच त्वचेसाठी हानिकारक रासायनिक रंगही बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पर्यटकांची गर्दी होणाऱ्या बाजारपेठांमध्ये या किमंती दुप्पट आहेत. रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगाची अधिक किंमत असली तरी ग्राहक हे पर्यावरणाच्या व त्वचेच्या सुरक्षिततेसाठी नैसर्गिक रंगांची खरेदी करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
---
पर्यटन स्थळावरील दुकानांमध्ये रंग साहित्याच्या किमती जास्त असतात त्यासाठी अनेक कारणे आहेत. येथे येणाऱ्यांची संख्या अनिश्चित असते, त्यामुळे रंगाचे साहित्य एकाच दिवसात विकण्याची संधी असते.
- सागर गुरव, व्यावसायिक, अलिबाग
---
रंगाने रंगल्यावर समुद्रात स्नान करण्याची मज्जा काही वेगळीच असते. दरवर्षी मित्रपरिवारासह ही मजा लुटत असतो. याची तयारी आत्तापासूनच सुरु झाली असून रंगाचे प्रकार, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या पिचकाऱ्यांची निवड केली जात आहे.
- श्रीनिवास कुलकर्णी, नागरिक