कर्नाळा पक्षी अभयारण्याला उन्हाच्या झळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाळा पक्षी अभयारण्याला उन्हाच्या झळा
कर्नाळा पक्षी अभयारण्याला उन्हाच्या झळा

कर्नाळा पक्षी अभयारण्याला उन्हाच्या झळा

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २७ (वार्ताहर)ः दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील व माळरानावरील पाण्याचे साठे आटत असल्याने माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही पाणीटंचाई जाणवते. पनवेल तालुक्यातील गोवा-मुंबई महामार्गावर कर्नाळा अभयारण्यातील पाणीसाठे आटू लागल्याने कर्नाळा पक्षी अभयारण्यात २७ ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कर्नाळा अभयारण्यात दोन नैसर्गिक पाणवठे आहेत. मात्र, उन्हाळ्यात हे पाणवठे कोरडे पडतात, शिवाय तलावांची पातळीही खालावते. त्यामुळे अभयारण्यातील पशू-पक्ष्यांना पूर्णपणे कृत्रिम पाणवठ्यातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पशू-पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, याकरिता वन विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात वन विभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येत असून यंदा उष्मा अधिकच वाढल्याने पशू-पक्ष्यांनाही झळा बसू लागल्या आहेत. अभयारण्य परिसरात २७ ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. वन विभागाने नेमलेले कर्मचारी कृत्रिम पाणवठ्यापर्यंत पाणी पोचवण्याचे काम करत आहेत.
ः------------------------------
पक्ष्यांना डिहायड्रेशनचा त्रास
पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्यात विविध प्रकारचे पशू-पक्ष्यांचे वास्तव्य आहे. याशिवाय स्थलांतरित पक्षीही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे वर्षभर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत अभयारण्यातील पाणवठ्यांवर मुबलक पाणी असते.; परंतु यंदा फेब्रुवारीमध्येच पाणीसाठे आटू लागल्याने पशू-पक्ष्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे.