
आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती एसआयटीत करा
खारघर, ता. २७ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कंपन्यांकडून हवेत सोडल्या जाणाऱ्या वायूंच्या पातळीचे परीक्षण करण्यासाठी लोकायुक्तांनी एसआयटी नेमण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले आहेत. या एसआयटी पथकात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी आदर्श सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी शासनाकडे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खारघर, तळोजा गाव आणि वसाहत, रोडपाली, कामोठे तसेच परिसरातील गावातील रहिवासी तळोजा औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या घातक रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. याविरोधात खारघरमधील काही सामाजिक संस्थांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली होती. त्यावर निर्णय देताना या प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश पर्यावरण विभागाला देण्यात आले होते. या पथकात शासनाने कर्तव्यनिष्ठ अधिकारी असलेले तुकाराम मुंडे किंवा महेंद्र कल्याणकर; तर पोलिस प्रशासनातून अतिरिक्त पोलिस महानिदेशक बिपिन कुमार सिंग तसेच माजी आयपीएस अधिकारी प्रवीण दीक्षित, शहाजी उमाप यांची नेमणूक करावी, असे पत्र आदर्श सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजीव सिन्हा यांनी शासनाकडे केली आहे. जेणेकरून या प्रकरणी योग्य चौकशी होऊन प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.