मराठी राजभाषा दिनाचा उत्‍साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी राजभाषा दिनाचा उत्‍साह
मराठी राजभाषा दिनाचा उत्‍साह

मराठी राजभाषा दिनाचा उत्‍साह

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ ः मराठी राजभाषा दिवस मुंबईसह उपनगरांत मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले. विशेष करून विविध शाळांमध्‍ये विद्यार्थी वर्गासाठी स्‍पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदवला.

गोरेगावमध्‍ये हस्ताक्षर स्पर्धा
गोरेगाव (बातमीदार) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा क्र. ८४ ने मराठी राजभाषा दिवसाचे औचित्य साधून हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली होती. रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे ही स्पर्धा पार पडली. यात विलेपार्लेसह इतरही ठिकाणचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आपली मातृभाषा समृद्ध होण्यासाठी अशा स्पर्धा भरवल्या गेल्या पाहिजेत, असे तेथील शाखाप्रमुख प्रकाश सपकाळ म्हणाले. यात निवडक विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जोगेश्वरीत ग्रंथदिंडी
जोगेश्‍वरी (बातमीदार) ः जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी पालखीतील ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या दिंडीत विश्‍वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, माजी नगरसेवक बाळा नर, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, अनिरुद्ध नारकर, श्रमिक शाळेचे विद्यार्थी तसेच रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन विद्यामंदिरात सांस्कृतिक कलाविष्कार
मानखुर्द (बातमीदार) ः नूतन विद्यामंदिरात मराठी भाषा गौरव दिन सोमवारी (ता. २७) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कारांचे तसेच स्वतः रचलेल्या कवितांचे सादरीकरण केले. शाळेचे मुख्याध्यापक भिवदास देवकर यांच्या संकल्पनेतून हे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कवयित्री मनीषा साळवी उपस्थित होत्या. नूतन विद्यालयात मराठी भाषा गौरव दरवर्षी साजरा करण्यात येतो. या वर्षी विद्यार्थ्यांनी नृत्यासह गवळण, भारुड, पोवाडा हे सांस्कृतिक कलाप्रकार सादर केले. मनीषा साळवी यांनी या दिवसाचे महत्त्‍व विद्यार्थ्यांना सांगितले, तसेच त्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांचे कौतुक केले.

ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात गुणदर्शन कार्यक्रम
घाटकोपर (बातमीदार) ः पवईतील ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमात विविध प्रकारचे साहित्यिक प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले‌. शाळेतील पाचवी ते दहावीच्‍या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करत मराठी राजभाषा दिन साजरा केला. त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले नगर ते ज्ञानमंदिर विद्यालय व इंदिरानगर अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. ग्रंथ दिंडीत-साहित्यिकांची, सुप्रसिद्ध नेत्यांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी पुस्तक प्रदर्शनाचे उद्‍घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रतीक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिक्षक वर्गानेदेखील विडंबन, भारुड, स्वागत गीत सादर करत मराठी भाषेचा झेंडा उंचावर नेला. या कार्यक्रमात पवई विद्यानिकेतन संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष गाडे, सहकार्यवाह कोटिया, संस्था सभासद बागायतकर आदी मान्‍यवर हजर होते.

एन वॉर्ड पालिकेत मराठीचा जागर
घाटकोपर (बातमीदार) ः मराठी ही महाराष्ट्राची राज्य भाषा आहे. केवळ एक दिवस मराठीचा गौरव करून मराठीला जिंकता येणार नाही, तर पालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने मराठीत बोलले पाहिजे, असे आवाहन एन वॉर्डचे महापालिका सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी केले. मराठी भाषा दिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी परिमंडळ सहाचे उपायुक्त देवीदास क्षीरसागर, कार्यकारी अभियंता सूर्यकांत सातपुते, ज्ञान मंदिर हायस्कूलचे संस्थापक अनिल झोरे आदी उपस्थित होते.
या वेळी सोनवणे म्हणाले, की मराठी भाषेने नेहमी इतर भाषांचा सन्मान केला आहे. परप्रांतातून येणाऱ्यांनादेखील या भाषेने सामावलेले आहे. आपण जेव्हा मराठीत बोलू तरच लोक आपली भाषा समजू आणि शिकू शकतील आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी जगेल, असे सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी प्रतिपादन केले.

श्री गणेश विद्या मंदिर शाळेत कार्यक्रम
धारावी (बातमीदार) : धारावीतील पहिली मराठी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत कक्कया विकास संस्था संचालित श्री गणेश विद्या मंदिर शाळेत मराठी राजभाषा दिवसाचे औचित्‍य साधत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भाषेचे महत्त्‍व सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जगायला शिकवते ती खरी मराठी
साहित्यिक डॉ. नंदा मेश्राम यांचे प्रतिपादन
वडाळा (बातमीदार) ः जगायला शिकवते ती खरी मराठी भाषा. प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असली तरी आज जेवढे तोकडे कपडे तेवढी मॉडर्न भाषा असे भाषेचे प्रमाण ठरू पाहतेय, आशा वेळी खरी मराठी भाषा जगवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नंदा मेश्राम यांनी मराठी भाषा गौरवदिनी काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने आणि सार्वजनिक ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने सोमवारी (ता. २७) परळ पूर्व येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात मराठी भाषा गौरव दिन झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सरचिटणीस आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते होते. डॉ. नंदा मेश्राम म्हणाल्या, की भा‌. रा. तांबे, केशवसूत, विंदा करंदीकर, बहिणाबाई आदी ज्येष्ठ साहित्यिकांच्या कवितेची भाषा काळजाला भिडणारी होती. ग्रामीण भागातील भाषेतून नात्यांचा पिळ विणला जातो तो विसरून चालणार नाही. प्राचीन काळापासून आलेली मराठी भाषा शिवरायांनी परकीय आक्रमणात वाचवली आणि संत परंपरेने तिला नवा आयाम प्राप्त करून दिला. शतकानुशतकाचा हा वारसा लाभलेली मराठी भाषा कदापि मरणार नाही; मात्र तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने पुढे आले पाहिजे. तर वाचनालयाचे अध्यक्ष आणि संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, मनातील भाषा केवळ अश्रूंनी प्रकट होऊन चालणार नाही, तर तिला कृतीची जोड दिली पाहिजे. आज साहित्य विपुल आहे, परंतु त्याच्या वाचनासाठी वाचकांना प्रवृत्त केले पाहिजे.
या वेळी वाचनालयाच्या प्रभारी ग्रंथपाल ममता घाडी, कथा लेखक काशिनाथ माटल, राष्ट्रीय मिल मजदूर संघ खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, रघुनाथ शिर्सेकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, मिलिंद तांबडे, आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी. बी. गावडे, कॅटरिंग कॉलेजचे प्राचार्य केतन सारंग आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, के‌. राघव कुमार, साई निकम, आशा आसबे, प्रतिभा ठाकूर, समृद्धी मालप आदींची भाषणे झाली.