
भेंडखळमध्ये कामगारांचा एल्गार
उरण, ता. २७ : उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सीडब्ल्यूसी) कंपनीने येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ, तसेच कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने हुकूमशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय करणाऱ्या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी.डब्ल्य.सी) कंपनी प्रशासनाविरोधात रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली ‘नोकरी बचाव’ आंदोलन सुरू आहे.
गेल्या १५ वर्षांपूर्वी हिंद टर्मिनल कंपनी काम करत असताना महिन्याला १२००० ट्यूज कंटेनर हातळणीचा व्यवसाय करीत होती. तसेच सी.डब्ल्यू.सी. कंपनीच्या नियमानुसार सर्व क्षेत्रफळ न वापरता हिंद टर्मिनल कंपनी भरमसाठ भाडे (५८ कोटी) देऊनसुद्धा ५०२ कामगारांना भरघोस पगार देत होती. आता मात्र पोलारीस लॉजिस्टिक्स पार्क कंपनीला सीडब्ल्यूसी कंपनीने भरमसाठ असलेले भाडे (२५ कोटीपर्यंत) कमी करत कंपनीतील सर्व क्षेत्रफळ वापरण्यास परवानगी दिलेली आहे. कंपनीचा कामाचा व्याप मागच्या कालावधीपेक्षा सध्या दुपटीच्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा कंपनीने कामगार व कामगारांच्या पगारात ६० टक्क्यांनी कपात केली असून कंपनी एकप्रकारे कामगारांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे. तरीसुद्धा स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कामगारांनी कंपनी सुरळीत चालू होण्यासाठी काही तात्पुरत्या अटी मान्य केल्या आहेत. तसेच उर्वरित राहिलेल्या स्थानिक कामगारांना काही कालावधीमध्ये समाविष्ट करून घेणे, अशी कामगारांची मागणी आहे.
---------------------------------------------
सी.डब्ल्यू.सी. लॉजिस्टिक पार्क कंपनीमध्ये पोलारीस लॉजिस्टिक्स पार्क कंपनी भाडे करारावर चालवण्यासाठी आलेली आहे. कंपनी व्यवस्थापनाबरोबर कामगार, ग्रामपंचायत कमिटीसोबत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत; परंतु त्या सर्व बैठकांत कामगारांच्या बाजूने समाधानकारक चर्चा झालेली नाही.
- किरण घरत, कामगार
----------------------------------
पोलारीस कंपनी प्रशासनाने उरणमधील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला आहे. कामगार हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र कामगारांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण होत नसल्याने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे.
- भूषण पाटील, कामगार नेते तथा जेएनपीए माजी विश्वस्त.
-------------------------------------
पोलारीस कंपनी प्रशासनाने जर कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कायदेशीर मार्गाने लढून कामगारांचे न्याय व हक्क त्यांना मिळवून देणारच! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे.
- प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रदेश सरचिटणीस