
कोल्हापूरच्या ओंकारला नवी मुंबई केसरीचा मान
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः नवी मुंबई महापालिका, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७४ ते १०० किलो खुल्या गटात कोल्हापूरच्या ओंकार चौगुलेने चुरशीच्या लढतीत सोलापूरच्या सूरज मुलानीला चितपट केले आहे. साताऱ्याच्या सुमित गुजर याने ५५ ते ६५ किलो वजनी गटात सोलापूरच्या सागर राऊतवर मात करून नवी मुंबई महापालिका राज्यस्तरीय कुमार केसरी मान मिळवला आहे.
कुस्तीसारख्या मराठी मातीतील रांगड्या खेळाला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिका दरवर्षी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा भरवते. दोन वर्षांच्या कोरोना प्रभावामुळे ही परंपरा खंडित झाली होती, पण यंदा घणसोलीतील महापालिका शाळा क्र. ७६/१०५ च्या मैदानावर २५ व २६ फेब्रुवारीला ही स्पर्धा पार पडली. यावेळी नवी मुंबई महापालिका चषक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला रसिकांची प्रचंड दाद मिळाली. याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांचे वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी श्रीराम पाटील, डॉ. तपन पाटील, विकास पाटील, सतीश म्हात्रे, अविनाश कदम, दत्तात्रय दुबे, युवराज पाटील, संदीप दळवी, प्रकाश गोंधळी, तुकाराम खुटवड उपस्थित होते.
--------------------------------
महिला गटात ठाण्याचा दबदबा
महिलांच्या ५५ ते ६५ किलो राज्यस्तरीय गटात ठाण्याच्या गौरी जाधव यांनी ठाण्याच्याच साक्षी फुलाटे यांच्यावर मात करीत राज्यस्तरीय महिला गटाचा विजेता चषक स्वीकारला. ५० ते ५५ किलो महिला कोकण विभागीय कुस्ती स्पर्धेत पायल मरागजे, रायगड, तसेच डॉली गुप्ता, मिरा-भाईंदर यांनी अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद पटकावले.
----------------------------------
चुरशीच्या लढती मुख्य आकर्षण
६५ ते ७३ किलो राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचे कुस्तीगीर सोनबा गोंगाणे यांनी कोल्हापूरच्या सौरभ पाटील यांच्यावर मात करीत विजेतेपदाचा बहुमान संपादन केला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रस्तरीय स्पर्धेमध्ये ४० ते ५० किलो वजनी गटात सारंग नरळे यांनी श्लोक पाटील यांच्यावर मात करीत विजेतेपद पटकावले.