
जुनी पेन्शन लागू करा; अन्यथा रेल्वे बंद करू
मुंबई, ता. २७ : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी; अन्यथा प्रसंगी रेल्वे सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनने दिला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
जानेवारी २००४ पासून केंद्रासह देशभरात टप्प्याटप्प्याने नवी पेन्शन योजना लागू केली. त्या वेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना एकरकमी काही लाख रुपये जमा होतील असे आश्वासन दिले होते; मात्र हे आश्वासन फोल ठरले आहे. त्यामुळे पुन्हा जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारने तात्काळ लागू करावी, या मागणीला जोर धरू लागला. त्यामुळे केंद्र सरकारने जुनी पेन्शन तात्काळ लागू करावी; अन्यथा देशभरात आंदोलनाची हाक देण्यात येईल, असा इशारा महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला दिला.
---
लोकप्रतिनिधींप्रमाणे पेन्शन द्या!
२००४ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर नवी योजना थोपवून त्यांचा वृद्धापकाळातील आधार सरकारने काढून घेतला. रेल्वे कर्मचारी दिवस-रात्र प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येतो. त्यामुळे लष्करातील सैनिक तसेच लोकप्रतिनिधींप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू का होत नाही, असा सवालही वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनकडून विचारण्यात आलेला आहे.