
मुंबई अग्निशमन दलाने घारीला दिले जीवनदान
पायात मांजा अडकलेल्या
घारीला जीवदान
मुंबई, ता. २७ : मांजा पायात अडकलेल्या एका घारीचा जीव वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. मंत्रालय परिसरातील जुन्या वडाच्या झाडावर घार अडकून पडली होती. त्याबाबत माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन तिची सुटका केली; मात्र घारीच्या पायाला गुंतलेला मांजा काढण्यापूर्वीच ती उडून गेली.
दरम्यान, अशा घटना वारंवार घडत असून कबूतर, कावळे वा घारी मांजाच्या बळी ठरत असल्याचे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. पक्षी अडकल्याबाबत दिवसाला चार ते पाच कॉल येतात. महिन्याला २५ पेक्षा अधिक पक्षी बळी जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत पक्षी-प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला नायलॉन मांजा धोकादायक ठरत आहे. सोमवारी अडकलेल्या घारीच्या पायातसुद्धा मोठ्या प्रमाणात मांजा गुंतल्याचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मंत्रालय परिसरात सर्वाधिक जुनी झाडे आहे. वडाच्या झाडांना दररोज कबूतर, कावळे वा घारी अडकल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत असल्याचे केंद्र अधिकारी राकेश साळुंके म्हणाले.
नायलॉन मांजावर राज्यात बंदी आहे. मांजाचा पक्ष्यांसह मनुष्याच्या जीवालाही धोका आहे. महापालिकेसह इतरही संबंधित विभागाने सक्तीची कारवाई करायला हवी, असे पक्षीप्रेमी अविनाश भगत यांनी सांगितले.