होलसेल मार्केटमध्‍ये दुकानाला आग

होलसेल मार्केटमध्‍ये दुकानाला आग

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे होलसेल मार्केटमधील कागदी व प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, ग्लास आदी साहित्य असलेल्या दुकानाला आग लागल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग तब्बल साडेचार तास धुमसत असल्याने धूर पसरला होता. या धुरामुळे खळबळ उडाली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी मंगळवारी पहाटेचे साडेतीन वाजले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागलेल्या दुकानामध्ये जास्त प्रमाणामध्ये कागदी व प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, ग्लास, रूम फ्रेशनर तसेच इतर पॅकिंग मटेरियल असल्याने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळ लागला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
ठाणे जांभळी नाका, खारकळ आळी या होलसेल मार्केटमधील प्रधान चाळीतील मे. सोनू पॅकेजिंग या तळ अधिक एक मजली अशा ६५० स्क्वेअर फुटांचा गाळा असलेल्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे नगर पोलिस, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दल यांनी धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र ही आग दुकानामध्ये जास्त प्रमाणामध्ये कागदी व प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, ग्लास, रूम फ्रेशनर तसेच इतर पॅकिंग मटेरियलला लागल्याने ती पसरत होती.
---------------------------------------------------------
दोन चोरट्यांना भिवंडीत अटक
भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : शहरातील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी व सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ-दोन हद्दीत गस्त वाढवून गुन्ह्यांना प्रतिबंध लावून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार, शांतीनगर पोलिस ठाण्याचे शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र म्हात्रे यांच्या तपास पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे दोघा अट्टल मोटरसायकल व सोनसाखळी चोरट्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
नूरमोहम्मद हानिफ अन्सारी (१९, रा. नुरीनगर, भिवंडी), शब्बीर मुन्ना खान (२७, रा. गायत्रीनगर, भिवंडी) अशी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. चार गुन्ह्यांतील एक लाख ७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील गुन्ह्यातील २२ ग्रॅम वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ८५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल तसेच नारपोली पोलिस ठाणे गुन्ह्यातील ४० हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
--------------------------------------------------------
घोडबंदर रोडवर ट्रक उलटला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : घोडबंदर रोड, गायमुख खाडीमार्गे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राजस्थान, जोधपूर येथून बेळगाव येथे निघालेला ट्रकचालकाचा ताबा सुटल्‍याने उलटला. चालक बनवारी लाल (४१) असे ट्रकचालकाचे नाव आहे. या घटनेत चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. ट्रकमधून ४१ टन वजनाच्या ३४ बॅगमधील काही चुना पावडर रस्‍तावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
चालक जखमी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी व कासारवडवली पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. तातडीने अपघातग्रस्त ट्रक व चुना पावडरच्या बॅग रोडच्या एका बाजूला करण्यात आल्‍या. त्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com