
सफाई कामगारांच्या आयुष्यात नवी पहाट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : राज्यातील सफाई कामगार बांधवांच्या आयुष्यात नवी पहाट उगवली आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारने राज्यभरातील सफाई कामगारांना हक्काचे घर, वारसांसाठी नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा हा निर्णय असून, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. २६) या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. भाजपा-शिवसेना युती सरकारने सफाई कर्मचाऱ्यांच्या वारीस पद्धतीची नव्याने व्याख्या करून सफाई कामगारांचे वारस किंवा जवळच्या नातेवाईकाला नोकरी, शिक्षित वारसाला सफाई कामगाराऐवजी तृतीय श्रेणीची नोकरी, वारसांना वेळेत नोकरी देण्याची हमी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या सरकारी व महानगरपालिकेमार्फत मिळालेल्या घराची मालकी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सफाई कामगाराचा मुलगा हा सफाई कामगारच राहू नये. त्याने शिक्षण घेऊन प्रगती करावी, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. त्याचबरोबर सफाई कामगारांची १०० टक्के पदे भरण्याची हमीही दिली. सफाई कामगारांच्या नियुक्तीत चालढकल करणाऱ्या सरकारी व महापालिका अधिकाऱ्यांनाही चपराक देऊन भरतीसाठी अधिकाऱ्यांवरच जबाबदारीही निश्चित केली आहे.
---------------
नातेवाईकांना नोकरी देण्याचा हक्क मिळणार
मुदतपूर्व व मुदतीनंतरही सफाई कामगार बंधू-भगिनींना पती, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, विधवा मुलगी, घटस्फोटित मुलगी, परित्यक्ता यांपैकी कोणालाही नोकरी देता येईल. यांच्यापैकी कोणी नसल्यास जवळच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचा हक्क मिळणार आहे. डोक्यावरून घाण वाहून नेणाऱ्या बांधवांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. सफाई कामगारांना कायमस्वरूपी हक्काचे घर मिळावे, यासाठी महापालिका वा सरकारी प्राधिकरणांनी सध्या दिलेल्या घराचीच मालकी सफाई कामगार कुटुंबाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
---------------
सफाई कामगारांसाठी भाजपा-शिवसेना युती सरकारने घेतलेले सर्व निर्णय क्रांतिकारक आहेत. तसेच सफाई कामगार बांधवांच्या पुढील पिढ्यांचे भविष्य घडवणारे आहेत.
- निरंजन डावखरे, आमदार