वसईत रंगला नाट्यरुपी ‘जागर मराठीचा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत रंगला नाट्यरुपी ‘जागर मराठीचा’
वसईत रंगला नाट्यरुपी ‘जागर मराठीचा’

वसईत रंगला नाट्यरुपी ‘जागर मराठीचा’

sakal_logo
By

विरार, ता. २८ (बातमीदार) : नऊवारी साडीतील शालेय मुली, लेझीम पथक, विविध मराठी वेषभूषेतील मुले आणि ग्रंथदिंडीने वसईचा परिसर फुलून गेला होता. साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि समाज मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समाज मंदिर, वसई येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘जागर मराठी’चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १४ व्या शतकापासून मराठी भाषेचे निरनिराळ्या कालखंडातील बदल घडविणारे संत, पंत, तंत (शाहीर) आणि वंत (विचारवंत) या वाङ्‍मयीन साहित्याचे नाट्यरूपी सादरीकरण झाले.
या नाट्याचे लेखन व संकलन प्रसिद्ध सुसंवादक कुणाल रेगे यांनी केले असून दिग्दर्शन मकरंद सावे यांनी केले. सूत्रधार म्हणून प्रसिद्ध निवेदिका धनश्री प्रधान-दामले यांनी त्यांच्या सहज-सुंदर ओघवत्या शैलीमध्ये मराठी भाषेची निरनिराळ्या कालखंडातील स्थित्यंतरे श्रोत्यांपर्यंत विस्तृतपणे पोहचवली. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायक दशरथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली मन्वंतर कला मंडळाने सादर केलेल्या नांदीने झाली.

--------------------

संत, पंत, तंत साहित्यदर्शन
संत वाङ्‍मय सादर करताना न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखोबा, संत सावतामाळी, संत शेख महंमद, संत फादर स्टीफन आदींचे अभंग, ओव्या म्हटल्या. विवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पंत वाङ्‍मयातील मुक्तेश्वर, वामन पंडित, कवी श्रीधर, कवी मोरोपंत यांच्या रचना सादर केल्या. तंत (शाहिरी) वाङ्‍मयाचे खणखणीत सादरीकरण लोककला अकादमी मुंबईचे डॉ. शिवाजीराव वाघमारे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत व शाहीर आत्माराम पाटील यांची छक्कड गाऊन केले. वंत साहित्य गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, वि. दा. सावरकर, नारायण सुर्वे, बहिणाबाई, कुसुमाग्रज इत्यादींच्या व्यक्तिरेखा साकारून सादर केले.